आजचा निबंध... महागाई ( वा... काय विषय आहे... मस्त... लै भारी... )
आज महागाई या विषयावर मला लिहायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. सध्या सगळ्यांच्या तोंडी हा एकच शब्द असतो. खरे तर महागाई म्हणजे काय हे सांगण्याची काही गरज नाहीये. पण निबंध म्हटला की त्या शब्दाचा अर्थ हा सांगावाच लागतो. तसा अलिखित नियमच आहे.
महागाई म्हणजे जी सगळ्यात मोठ्ठी, महत्वाची, सगळ्यात शक्तिशाली गाय असते ती. म्हणूनच तिला महागाई असे म्हणतात. खोटे वाटते तुम्हाला? उदा. देवांचे देव म्हणजे महादेव, पैसा, संपत्ती, लक्ष्मी यांची देवता महलक्ष्मि, सगळ्यात वरचा मंत्री म्हणजे महामंत्री तसेच सगळ्यात शक्तिशाली गाई म्हणजे महागाई. कळलं?????? ( टीव्हीवरील टुकार सिरीयल ‘पुढंच पाऊल’ मध्ये आक्कासाहेब सुद्धा नेहमी असेच म्हणत असतात. कोणालाही... बहुतेक त्यांना फक्त हा शब्द उच्चारला तरच एपिसोडचे पैसे मिळतील असे त्या सिरीयलच्या निर्मात्याने बजावून सांगितले असावे... असो मला काय करायचे... )
मला महागाई खूप आवडते. आपल्या सरकारला सुद्धा महागाई खूप आवडते. याला दोन कारणे आहेत
१. आपला बहुसंख्य हिंदू धर्मियांचा देश आहे आणि हिंदूंना गाय माता वाटते.
२. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला अनेक कारणाने गाय ही महत्वाची असते.
आणि ही तर महागाई... मग नको का आवडायला? जसे महादेव, महलक्ष्मि अगदी महामंत्री सुद्धा सामान्य जनतेसाठी अदृश्य रुपात असतात तशीच महागाई सुद्धा अशीच अदृश्य रुपात असते पण वेळोवेळी आपले अस्तित्व लोकांना दाखवीत असते. महागाईला चार पाय असतात. सरकारी नोकरी, आय टी कंपनीतील नोकरी, कार्पोरेट नोकरी ( व्यवस्थापन क्षेत्रातील ) आणि राजकारण असे ते चार पाय होत. या चार पायांच्या जोरावर ती खंबीरपणे उभी असते. तिच्या तोंडाला सरकारी बाबू असे नांव आहे. ते नेहमी काहीतरी खात असते आणि एरवी रवंथ करीत स्वस्थ बसलेले असते. तिच्या डोळ्यांना CBI असे संबोधले जाते. ते नेहमी तेच पाहतात जे तिचा मालक ( सरकार ) त्यांना पाहायला सांगतात. तिला दोन शिंगे सुद्धा असतात. सबसिडी कपात आणि भाववाढ. ही शिंगे महागाईची महत्वाची अस्त्रे आहेत. तिला दोन कान सुद्धा असतात. काही जण उगीचच त्यातील एकाला विरोधी पक्ष आणि दुसऱ्याला मिडिया असे म्हणतात. तिला एक भले मोठे पोट आहे. त्याला काहीजण अर्थव्यवस्था असे म्हणतात. सरकार नेहमी याची काळजी घेते. असे म्हणतात की या पोटात ३३ कोटी राजनेत्यांचा वास असतो. ( वास म्हणजे राहणे... उगाच गैरअर्थ काढू नका ) तिला एक शेपटी असते. ज्याला जनता असे म्हटले जाते. थोडक्यात काय तर ३३ कोटी राजनेत्यांनी लटकवलेली ती... जनता... त्यामुळे या जनतेच्या वाट्याला अर्थव्यवस्थेतून न पचलेला भाग... ( कोणी कोणी त्याला शेण असे म्हणतात ) तेवढा येतो. जशी सामान्य गाय दुध देते तशी ही महागाई आपल्याला नवीन नवीन योजना देते. उदा. FDI, खुली आणि निर्बंधित अर्थव्यवस्था, निर्यातीवर प्रतिबंध इत्यादी इत्यादी. अशी ही महागाई मला खूप खूप आवडते... त्यासाठी तर मी तिची आरती सुद्धा लिहिली आहे. मला वाटते जी सगळ्यांनी रोज किमान दिवसातून ३ वेळेस तरी म्हटली पाहिजे...
जय जय महागाई बोला जय जय महागाई
तुमच्या दर्शनाने २ घाबरते बाई, बोला जय जय महागाई ||
तुमच्या कृपेने होती प्रजाजन हो त्रस्त देवी प्रजाजन हो त्रस्त
येणाऱ्या पगारावर 2 ठेवू कशी भिस्त, बोला जय जय महागाई ||
तुम्ही कृपा ही केली झाली मला पीडा देवी झाली मला पीडा
१० रुपये खर्चूनही 2 आज मिळत नाही विडा, बोला जय जय महागाई ||
तुमच्या येण्याने देवी सुखावती राजकारणी देवी सुखावती राजकारणी
इथूनच भ्रष्टाचाराची 2 होते पायाभरणी, बोला जय जय महागाई ||
तुमचा वापर देवी राजकारणी करिती देवी राजकारणी करती
मिलिंद प्रेरित झाला 2 केली आरती तुम्हावरती, बोला जय जय महागाई ||
मिलिंद जोशी, नाशिक...