मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

शपथ प्रेमाची:
नजरेस तुझ्या स्वप्नांची लाभली अनंगी छाया,
उधळली जशी रतिवरती मदनाची अथांग माया.
अधरांच्या कोमल कलिका प्राषति रंग प्रीतीचे,
अलवार स्पर्शता त्यांना थरथरले क्षण रातीचे.
ती ओढ अनामिक मजला लागते तुझ्या भेटीची
पाऊले टाकितो राया ये जशी लाट भरतीची.
आभाळ भरोनी येई शमविण्या क्षुब्ध धरतीला,
वर्षाव साहण्यापरता तुज मार्ग नसे परतीला.
हे सप्तरंग प्रेमाचे सजवितील कोमल काया,
हा निसर्ग घेउनी ताना मग दावील अपुली किमया.
लाभेल मनाला शांती होईल तनुची तृप्ती,
नेत्रात नव्या नात्यांच्या फुलतील अलौकिक ज्योती.
***
जगण्यात कधी नच होती जी आर्त असोशी मजला,
सरणावर ना सरण्याची मी शपथ वाहतो तुजला....
.....(RJN)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा