विडंबन....
विडंबन या बद्दल माझे विचार मला खूप दिवसांपासून मांडायचे होते. आज त्याबद्दल व्यासपीठ सुद्धा मिळाले आणि अनेक वाचकही. नाहीतरी तसेही आपल्या साहित्याला(?) वाचक मिळणे आजकाल दुरापास्तच झाले आहे. आणि त्यातून जर ते विडंबन असेल तर ते वाचून अनेकांच्या भावना दुखावतात त्यामुळे जे असतात ते सुद्धा पळून जातात. खरे तर विडंबन हा साहित्य प्रकार अत्र्यांपासून सुरु झाला. म्हणजे त्यावेळेसच्या कवींनी ज्या काही कविता केल्या त्यातील दोष काढण्याचे काम अत्र्यांनी केले आणि ते सुद्धा कधी अति रंजीत पणे वाक्ये बदलून तर कधी वाक्याचा विपर्यास करून. आणि त्यांना सुद्धा मग त्यावेळेसच्या कवींकडून टीकेचे धनी व्हावे लागले आहे. हे सगळे आपल्याला प्र के अत्रे यांच्या ‘मी विडंबनकार कसा झालो’ या लेखात वाचायला मिळते.
मी काही मोठा विडंबनकार नाही. पण आता बरेच लोकं मला इथे विडंबन करणारा म्हणूनच ओळखतात. कित्येकांनी तर मला विडंब्या, वाटलाव्या, कवींचा सर्वात मोठा शत्रू अशा उपाध्या सुद्धा दिल्या आहेत. मलाही त्याचे काही वाटत नाही कारण मी वागतोच तसा तर मला लोकं हेच देणार ना! असो मी इथे माझ्याबद्दल बोलायला नाही तर विडंबनाबद्दल बोलायला आलो आहे.
एखादया कवितेची चाल उचलून त्यावर स्वतःचे शब्द बसवून त्या कवितेला विनोदी अंगाने सादर करणे म्हणजे विडंबन असे काहीतरी मला वाटते. पूर्वी कविता म्हटली की त्या वृत्तात बसविलेल्या असत. आणि त्यामुळे विडंबनामध्ये सुद्धा वृत्ते अलंकार यांचा वापर दिसत होता. आता बऱ्याच कविता ह्या मुक्तछंद या प्रकारात मोडत असल्या कारणाने आता विडंबनात सुद्धा या गोष्टींची वानवा दिसते. बऱ्याच वेळेस विडंबन करण्यासाठी ज्या कवितेची निवड केली जाते त्या कवितेच्या कवीला ती गोष्ट मुळीच आवडत नाही. कारण एक प्रकारे आपण ती त्याच्या विचारांची, त्याच्या कलेची केलेली टवाळकी असते. आणि त्यामुळेच विडंबनकार हा कवीला त्याचा सर्वात मोठा शत्रू वाटू लागतो. पण जर विडंबनकाराच्या बाजूने विचार केला तर त्याने केलेले एखादया कवितेवरील विडंबन हे त्या कवीच्या प्रतिभेला दिलेली पावतीच असते. कारण आजकाल विडंबन करण्यासाठी त्याच कवितेची निवड केली जाते जी मुळातच प्रसिद्ध असेल किंवा जी पुढे चालून प्रसिद्ध होऊ शकेल. पण तरीही या प्रकारामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही. आज ९०% विडंबन हे फक्त लोकांना त्यांच्या रोजच्या त्याच त्या आयुष्यातून थोडेसे हसरे करावे याचं उद्धेशाने केले जाते. त्यामध्ये त्या कवीचा, त्याच्या कवितेचा किंवा कलेचा कोणत्याही प्रकारे अवमान करावा ही भावना कधीच नसते. कधी कधी काही माणसे एखादया कवितेशी, गाण्याशी इतकी समरस असतात की त्यावर केलेले विडंबन हे त्यांना कदापी रुचत नाही. असेच एक दिवस एका ग्रुपवर माझ्या एका मित्राने ‘दाटून कंठ येतो’ हे गाणे पोस्ट केले होते. अगदी अप्रतिम गाणे. हे गाणे ऐकून अजूनही माझ्या डोळ्यात पाणी येते आणि ही अवस्था बहुतेक सगळ्यांचीच होते हे गाणे ऐकून. आणि नेमका त्याचं वेळी माझ्यातील वाटलाव्या, विडंब्या जागा झाला. आणि त्या पोस्टच्या कमेंट मध्ये मी त्यावर केलेले विडंबन टाकले.... ‘घोटून भांग घेतो’ असे. झाले त्याचे डोके फिरले माझे विडंबन वाचून. रात्री दोन अडीच पर्यंत तो मला शिव्या देत होता आणि मी स्वॉरी स्वॉरी म्हणत होतो. पण व्हायचे तेच झाले आणि आमची मैत्री तुटली ती कायमचीच. पण नेहमी असेच अनुभव येतील असे नाही. याचं विडंबनामुळे मला खूप मित्र सुद्धा झाले आहेत. हेच विडंबन एका मुलीला इतके आवडले की तिचे माझ्याबद्दल असलेले आधीची सगळी कडवट मते दूर झाली होती. त्यामुळे राग आला तर सोडून द्या आणि विडंबनाचा आनंद घ्या... काय?????
मिलिंद जोशी, नाशिक...
त्यामुळे राग आला तर सोडून द्या आणि विडंबनाचा आनंद घ्या... काय?????
उत्तर द्याहटवाRIGHT