बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

कोणती ती परी आज अवनीवर आली, 

जादुई नगरीची स्वये सम्राज्ञी झाली,

गिरकी घेता तिच्या वदनावर रुपेरी प्रभा पसरली,

रिझविते ती सार्यांना अखंड रात्र सारी.

(अद्याक्षरे घ्या)


(को जा गि री..)

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

लावणी



गजरा ..

राया इष्काचा गजरा माझ्या केसात गुपचूप माळला ,
झाला बोभाटा आपल्या प्रेमाचा, गंध गावात दरवळला ...।।
ज्वानीचा प्रसाद दावला मी तुम्हाला
उपाशी पोटी तुम्ही लावला मुखाला
कसं रातीला पारणं फिटलं,
झाला बोभाटा .......।।१।।
तुमच्या इष्काचा गजरा लई न्यारा
भरल्या बाजारी मिरवीते मी तोरा
कशा झेलू मग वखवख नजरा,
झाला बोभाटा .......।।२।।
आता झाला शृंगार माझा पुरा
आणा डोली बिगीन माझ्या दारा
उबरठ्यावर लोटा घरंगळला,
झाला बोभाटा .......।।३।।

..
(RJN).............
रत्नाकर नाईक ........

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

शपथ प्रेमाची:
नजरेस तुझ्या स्वप्नांची लाभली अनंगी छाया,
उधळली जशी रतिवरती मदनाची अथांग माया.
अधरांच्या कोमल कलिका प्राषति रंग प्रीतीचे,
अलवार स्पर्शता त्यांना थरथरले क्षण रातीचे.
ती ओढ अनामिक मजला लागते तुझ्या भेटीची
पाऊले टाकितो राया ये जशी लाट भरतीची.
आभाळ भरोनी येई शमविण्या क्षुब्ध धरतीला,
वर्षाव साहण्यापरता तुज मार्ग नसे परतीला.
हे सप्तरंग प्रेमाचे सजवितील कोमल काया,
हा निसर्ग घेउनी ताना मग दावील अपुली किमया.
लाभेल मनाला शांती होईल तनुची तृप्ती,
नेत्रात नव्या नात्यांच्या फुलतील अलौकिक ज्योती.
***
जगण्यात कधी नच होती जी आर्त असोशी मजला,
सरणावर ना सरण्याची मी शपथ वाहतो तुजला....
.....(RJN)
म्हणे आजच्या माझ्या वागण्यातून तू दुखावलीस....
आठवतंय का ? माझ्या मायाळू कटाक्षाने शेवटचं कधी बरं सुखावलीस....
कालची माझी कुजबुज, गोंगाट वाटतो आज तुला,
खरंच सांग, माझा तेव्हाचा उबदार स्पर्श ,भाजतोय आज तुला..??
....(RJN)
पाहत होतो वरून तुला, 
माझ्या विरहात रडताना,
मी गेलो तरी तू मात्र आपलं गुपित दडवून ठेवल होतंस,
तुझे अश्रू मात्र फितुरी करू पहात होते,
माझी बदनामी टाळण्यासाठी तू फारमोठं धाडस करू धजलीस....
ते माझ्यासाठी मोलाचं होतं,
तुझा दुःखाचा डोंगर जगापासून दडून राहावा यासाठी,
मी पाऊस बनून आलो,
तुझ्या गालावरची आसवे माझी सवंगडी झाली......
जगाला दिसणार नाहीत तुझे अश्रू,
मी त्याना माझ्यात सामाऊन घेतलंय,
पण हे शेवटचेच हं,
तुला रोज रोज असं पावसात भिजता येणार नाही,
कोरड्या मातीत तसंही रुजता येणार नाही,
जिवंतपणी तुला काही देऊ शकलो नाही......
माझ्या आठवणी आता तूच मला परत दे..........
मला त्या परत मिळायलाच हव्यात,
मी गेल्यावर तुला सुखी ठेवण्याचा
हा एकाच मार्ग आता उरलाय....... (RJN)
माणसाच्या जगण्याचा आणि जगण्याच्या प्रयोजनाचा शोध अनादी काळापासून सुरु आहे , आणि तो सुरूच राहणार आहे.
ज्यांना तो लागला ते प्रेषित ठरले. बुद्ध, महावीर, नानक यांनी लोकांना तो मार्ग दाखवला.
परंतु त्यांचे अनुयायी मात्र नेमके उलट मार्गाने जात राहतात हीच तर शोकांतिका आहे,..
त्यामुळे असा शोध लागेपर्यंत आपण चालत राहायचे. 
चालता चालता नवनवीन शोध लागत रहातात, आपण त्यांचा आनंद घ्यावा.
अवघड गोष्टींची आस लागणे हे स्वत्वाच्या जाणिवेचे एक लक्षण आहे,...
याचा अर्थ आपले अंतर्मन जागृत आहे.
आणि जागृत अंतर्मनाच्या माणसाना जागोजागी अज्ञानाचा सामना करावा लागतो,....
आणि असा सामना करतानाच समविचारी व्यक्तींचा शोध लागतो....
एकूणच काय, असा शोध घेत राहण्यामुळे आपल्याला इतरांहून वेगळा असा आत्मानंद प्राप्त होतो...
(रत्नकांत ...)
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे असावे हा आग्रह किंवा दुराग्रह आपण का बाळगावा ?
ज्याने त्याने आपापल्या परीने ते शोधावे ! 
किमान ज्याच्याकडे आहे, त्याच्या मागे आपण ठामपणे उभे राहावे असे मला वाटते.
ज्यांच्या अंगी हाती घेतलेल्या कार्यात यश येईल कि नाही याचा विचार न करता अखंड पाठपुरावा करण्याची चिकाटी आहे. स्वतःच्या भूमिकेची स्पष्ट जाणीव आणि मायभूमी विषयी नितांत भक्ती आहे, अशा व्यक्तींना होणारा प्रचंड विरोध, आणि तो सहन करायची त्यांची ताकद पहिली, कि हात आपोआप सलाम करायला वर जातो.
त्यांना पाठींबा देऊन त्यांचे बळ वाढवणे, एव्हढे सोपे काम तर प्रत्येक सुजाण माणसाला सहज जमेल. 
त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधात बसायची गरज नाही.
ती:तुझा कोरडा एकच प्रश्न ...
तू प्रेम करतेस का माझ्यावर...
मी हि न लाजता ..पटकन उत्तर द्यायची ...
हो रे ....तुला माहित नाही का?...
आणि तू निमूट पणे..निघून जायचास ....
...[THIS PART IS COMPOSED BY MY FRIEND SADHANA VARMA]
.
तो:माझे ते जाणे तुला कदाचित बोचले असेल...
पण खरं सांगू, मला हे ऐकू येईल अशी अशाच मी सोडली होती.
नकार ऐकायची सवय कधीचीच अंगवळणी पडली होती.
वाटायचं, तू लगेच म्हणशील, "मी थट्टा केली"
मला ते ऐकायचे नव्हते ,
हा होकार कल्पांतापर्यंत मला माझ्या कानात निर्भेळ साठवून ठेवायचा होता,
म्हणून मी जायचो.......
......[THIS PART IS COMPOSED BY ME]..
......RJNAIK
विश्वासाचे झाड रुजायला बी जमिनीत खोल पुरावे लागते,
मग ते झाड खूप उंच वाढते...
मात्र त्याचे खोड अत्यंत नाजूक असते...
गैरसमजाच्या हलक्याश्या झुळुकीनेहि ते उन्मळून पडते.... 
त्यासाठी त्याभोवती समंजसपणाचे काटेरी कुंपण घालावे लागते.....
मी न सांगता कळून घ्यावे हि अपेक्षा जरूर असावी.
पण माझ्या अपेक्षांचे काय?
कि रोजच्या माझ्या रागाचेही तुला व्यसन जडलेय.....!!!
माझ्या हट्टानाही राग समजत आलास,
आठव ते दिवस, माझ्या रागालाही हट्ट समजायचास ....
मी फुलं मागण्या आधीच वेली रुजवायचास, 
चांदणं मागण्या आधीच क्षितीज सजवायचास ...
श्वास घेण्या आधीच पावा वाजवायचास,
अपुऱ्या प्रहरी सांजवायचास, 
मृगाआधी रोहिणी भिजवायचास...
आज तुझा पावा अबोल, मी मात्र मुलुख मैदान..!!!!
तुझा मृग उगवेना, माझा ग्रीष्म अविरत?
चढणीचा सूर्य तळपुन गेला , तिसऱ्या प्रहरी जाताना आता ती तप्तता साहवेना...
आयुष्याची गोळाबेरीज करताना, बाकी थोडीतरी उरू दे,
शेवटचे वळण आलेय,
निवांत एकदातरी तुझ्या कुशीत शिरू दे......
निवांत एकदातरी तुझ्या कुशीत शिरू दे........
...(RJN)
कोंडल्या दुःखास भिडती आसवांचे कासरे,
आटल्या कासेस जैसी लुचतात भाकड वासरे....
भंगल्या वचनात कोणी का भरावे पोहरे 
पांगल्या कळपात कैसे सापडावे मोहरे ....,
.....(RJN)
घालून प्रीतीच्या शपथा, ती कधीच रुसली नाही...
वेढ्यात करांच्या अलगद ती कधीच फसली नाही.!
उन्माद तयाचा तिजला का कधीच चढला नाही,
श्वासांचा दबल्या वारू क्षितिजाला भिडला नाही...!!!!!!!
...(RJN)

आज दशहरा, सीमोल्लंघनाचा दिवस. आज लावणीच्या राज्यात प्रवेश करून माझी कविता सीमोल्लंघन करतेय, गोड मानून घ्यावी हि विनंती.... रत्नकांत..
.
.
.
.....
गजरा ..
.
राया इष्काचा गजरा माझ्या केसात गुपचूप माळला ,
झाला बोभाटा आपल्या प्रेमाचा, गंध गावात दरवळला ...।।
ज्वानीचा प्रसाद दावला मी तुम्हाला
उपाशी पोटी तुम्ही लावला मुखाला
कसं रातीला पारणं फिटलं,
झाला बोभाटा .......।।१।।
तुमच्या इष्काचा गजरा लई न्यारा
भरल्या बाजारी मिरवीते मी तोरा
कशा झेलू मग वखवख नजरा,
झाला बोभाटा .......।।२।।
आता झाला शृंगार माझा पुरा
आणा डोली बिगीन माझ्या दारा
उबरठ्यावर लोटा घरंगळला,
झाला बोभाटा .......।।३।।
.....(RJN)
 —

जीवनाला दान थोडे....

जीवनाला दान थोडे मागायचे आतातरी
रे मना तुझिया कलाने वागायचे आतातरी

ही वजाबाकी नव्याने मोजायची का रे पुन्हा
हे नशीबा मी ठरवले भागायचे आतातरी

काय झाले काल ते हो उगळायचे नाही मला
या जगाला माफ केले, टाळायचे आता तरी

काय सांगू काय होती माझी परी अन् ती कथा

का तिचे मी नाव वेडे काढायचे आतातरी

भोगलेली आपबीती मकरंद मी बोलू कुणा
एकटे मी प्रेत माझे जाळायचे आतातरी

बेहेरे मकरंद
रजी.नं: २७९१०१३०११०२८०९१
=९१ ९७७३५ ०००१०

फेसबुक ची गोस्ट...............!!!

काय सांगू  राजा ह्या 
फेसबुक ची गोस्ट
हौसे, गौसे, नौसे इथे 
सारेच दिसतात मस्त 
                   
कवी लेखक विचारवंतांची 
तर येथे कमीच नाई 
कंपुगिरी वाल्यांची 
तर रीतच हाय  न्यारी 

गृपवाल्यांची संख्या  तर 
लाखोच्या घरात 
नाव सुद्धा राज्या त्यांचे 
लयच हायत खास 

फेक वाल्यांची तर 
अति  कमीच नाई 
ख-या लोकाएचे अति 
काईच खर नाई

लहाना पासून तर मोठ्यांपर्यंत 
सारेच दिसतात अति 
कमतरता नाही कोणाचीच 
नमुने लई भारी 

इथे काही फेस घेऊ 
फेसबुक वर वावरतात 
चेहरा नाही स्वताचा 
नावेही फेकच असतात 

काय सांगू राजा या 
फेसबुक ची गोस्ट 
शेजारच शेम्बड पोट्ट 
तेही दिसते मस्त 

कमेंट नाही देता येत 
म्हणून लाईकच  करते 
दिसली जर एखादी पोट्टी  ओन्लाईन
तर हे बेन गालातच हासते 

समजत नाही काईच याले 
मले बोर लई करते 
रिक्वेस्ट  कशी पाठवू म्हणते 
शेजारच्या बलीले 

फेसबुकवरची गर्दी
जत्रे सारखी झाली 
हवसे गवसे नवसे सतरा 
सारेच हायेत भारी 

- मोहन कु-हाडे...

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

निबंध....एकता....


तसा मी निबंध खूप लिहिलेत. पण मला त्यसाठी मार्क कधीच मिळाले नाहीत. अगदी १० वी पर्यंत... नेहमी मला त्यात मोठ्ठा शून्य मिळायचा. कारण मला अजूनही समजलेले नाही.... आता सुद्धा एक निबंध लिहीत आहे. किमान मला सांगा तरी माझे काय चुकते?....

निबंध....एकता.... ( हो मला असेच विषय असायचे निबंध लिहिण्यासाठी )

एकता.... एकता म्हणजे एकीने राहणे. आता तुम्ही म्हणाल की जर फक्त एकीने राहणे तर दुसरीने कुठे जाणे? ते मला काय माहित? तिला विचारा ना! बहुतेक ती गेली असेल एखादा चित्रपट पाहण्यासाठी. त्या चित्रपटामध्ये सुद्धा एक एकता आहे. ती अमीर खान ची हिरोईन आहे. आता ती चित्रपटात काम करीत नाही कारण तिने मोहनीश बहल याच्याशी लग्न केले आणि तो तर खलनायक आहे मग तो तिला कसे काय आता चित्रपटात काम करू देईल? आता तो टीव्ही वर सिरिअल मध्ये सुद्धा काम करतो. टीव्हीवर सुद्धा एक एकता आहे. ती एकाच कथेवर '' हे अक्षर घेऊन खूप सिरीयल बनवते. तिचे वडील जितेंद्र आहे. जितेंद्र हा शब्द जितेंद्रिय या शब्दाचा अपभ्रौंश आहे. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांवर जय मिळविणारा. पण याला हे कधीच जमले नाही त्यामुळे तो नाचताना फक्त माकडा सारख्या उदया मारायचा. त्याला एक मुलगा सुद्धा आहे. त्याचे नाव तुषार आहे. तो फक्त 'एओ एओ' करीत असतो. त्याचं काय अर्थ आहे हे तुम्ही त्याला विचारू शकतात. कारण त्याला कोणीच काम देत नसल्यामुळे तो नेहमीच रिकामटेकडा असतो. त्याची बहिण एकता ही काळे कपडे घालते. आणि कपाळावर मोठ्ठे गंध लावते. ती आपल्या पेहेरावावरून आपण समाजाला काय देतो हे सुचवते. एकता वर मला अजूनही खूप काही बोलता येईल पण फक्त १० मार्कांसाठी मी माझा वेळ वाया घालू शकत नाही. जो माझ्या निबंधाला १० पैकी १० मार्क देणार नाही त्याच्या जीवनावर एकता नवीन सिरिअल काढेल आणि त्याला हिरो म्हणून घेऊन त्याच्या बायकोचे किमान १० लफडे दाखवेल अशी मी देवाजवळ प्रार्थना केली आहे.

मिलिंद जोशीनाशिक...

विडंबन....


विडंबन....

     विडंबन या बद्दल माझे विचार मला खूप दिवसांपासून मांडायचे होते. आज त्याबद्दल व्यासपीठ सुद्धा मिळाले आणि अनेक वाचकही. नाहीतरी तसेही आपल्या साहित्याला(?) वाचक मिळणे आजकाल दुरापास्तच झाले आहे. आणि त्यातून जर ते विडंबन असेल तर ते वाचून अनेकांच्या भावना दुखावतात त्यामुळे जे असतात ते सुद्धा पळून जातात. खरे तर विडंबन हा साहित्य प्रकार अत्र्यांपासून सुरु झाला. म्हणजे त्यावेळेसच्या कवींनी ज्या काही कविता केल्या त्यातील दोष काढण्याचे काम अत्र्यांनी केले आणि ते सुद्धा कधी अति रंजीत पणे वाक्ये बदलून तर कधी वाक्याचा विपर्यास करून. आणि त्यांना सुद्धा मग त्यावेळेसच्या कवींकडून टीकेचे धनी व्हावे लागले आहे. हे सगळे आपल्याला प्र के अत्रे यांच्या ‘मी विडंबनकार कसा झालो’ या लेखात वाचायला मिळते.

एका तळ्यात होती - विडंबन काव्य



१९५८ मध्ये आलेल्या 'सुखाचे सोबती' चित्रपटातील 'एका तळ्यात होती' या गीताची चाल आजच्या
विडंबनासाठी मी वापरीत आहे. गदिमा यांचे गीत, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि आशा भोसले यांचा अप्रतिम आवाज या गीताला लाभलेला आहे. 
विडंबनाबद्दल बोलायचे तर सध्या फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईटवर आपण खूप ग्रुप बनवतो. त्यात मग काही जण अद्मीन असतात आणि बाकीचे त्या ग्रुपचे मेंबर. ग्रुप म्हटले की अनेक मेंबर आणि त्यांच्या अनेक तऱ्हा ह्या आल्याच. पण काही काही मेंबरची नावे अशी काही असतात की ती व्यक्ती खरी कोण आहे हेच मुळी समजत नाही. हीच थीम / विषय आजच्या विडंबनाचा आहे. 

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख....

एका ग्रुपवर होती, मेंबर हो अनेक 
होते अकौंट खोटे, त्यांच्या मध्ये ही एक 

कोणी न त्यास देई एक साधाही कमेंट
कोणा ही न संगे झाला त्याचा कधी समेट 
एकटे पाडती त्याला, त्या ग्रुपचे काही लोकं 
होते अकौंट खोटे, त्यांच्या मध्ये ही एक 

बोले न तो कुणाशी, कविता करी जराशी 
केली जरी हुशारी, बोले ना तो तयाशी 
त्याच्यात काय होती अशी कोणती सणक 
होते अकौंट खोटे, त्यांच्या मध्ये ही एक 

एके दिनी परंतु अद्मीनला त्या कळाले 
खवळले पित्त त्याचे, तोंडचे पाणी पळाले 
भाळी उठले त्याच्या, काळजीचे भाव अनेक 
खाते नसून होता, तो व्हायरस एक... 


मिलिंद जोशी, नाशिक..................

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

हार्दिक स्वागत.......

***
सर्वांचे स्वागत आहे ..............
                   
                   इंटरनेटवर मराठी साहित्याच्या प्रसारासाठी चालवलेल्या या अभियानात आपले लैच वेळा स्वागत आहे. 
“रेणुका परिवार”च्या माध्यमाने  ब्लॉगर्स एका वेगळ्या विश्वात पदार्पण करणाऱ्या आपल्या सर्व पारिवारिक सदस्यांचे हार्दिक स्वागत.......

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

सुप्रभात ......

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

स्वागतम ..........

                               परिवारात आपले लैच वेळा स्वागत आहे ....................!!!