मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

स्नानपुराणं

घोळ आणि आंघोळ यांचा काही संबंध आहे का? आं"घोळ" झाल्या नंतर "घोळ"दार पायजमा वगैरे वगैरे कपडे असतातच ........ “घंगाळ” शब्दाचा या घोळाशी संबंध आहेच. आंघोळ न करता वंगाळ राहणारे असणारच ना?
काही माणसे कधी कपडे बाहेर { म्हणजे बाथरुमच्या} विसरतात आणि “हर गंगे भागीरथी” करत करत आणि देव जाणे ( खरंच तोच जाणो रे बाबा) कोणकोणत्या देवांची स्तोत्रे म्हणत म्हणत { हे यांची आंघोळ चालू आहे हे लोकांना का ओरडून सांगतात नकळे} जोरदार बाद्ल्याच्या बादल्या अंगावर ओतून घेउन आंघोळ करतात आणि कपड्यांचा घोळ बाहेरच विसरलेले असतात .............काही जण साबण संपलाय हे उशिरा लक्षात आल्यावर फार म्हणजे फार अस्वस्थ होतात. बाथरूम मध्ये एखादा साबणाचा [ लिक्विड सोप प्रमाणे] सुद्धा नळ वगैरे असावा असे या लोकांना अशा वेळेस वाटत असावे बहुतेक. [ मला लहानपणी { कंसात कंस- म्हणजे माझ्या लहानपणी बरं का दाजी } असे रस्तोरस्ती चहाचे, कॉफीचे, विविध सरबतांचे नळ असावेत असे फार्र्र्र म्हणजे फार्रर्र वाटत असे. आणि त्याला १-१ मैलावर कॉक असावेत. झाली इच्छा की पी चहा किंवा कॉफी किंवा सरबत ........ पण मी “नल राजा” न होता “हेमंत” झाल्याने ते वास्तवात आले नाही. ] आणि अंगावर चार तांबे पाणी ओतून घेऊन झाल्यावर साबणाची आठवण झाल्याने यांची चिडचिड होते. अस्वस्थ होतात हे लोक. ( आणि हातातली कामे सोडून यांना साबण देत बसावे लागल्याने बाहेरचे अस्वस्थ) मग ते हात { फक्त} बाहेर काढून साबण हळूच आत घेणे वगैरे वगैरे ........या साबण आत घेण्यातले आणि अर्थातच देण्यातले जे विविध प्रकार होतात [म्हणजे ते कोण देतय आणि कोण घेतय यावरून] त्यावर एक वेगळा लेख होऊ शकेल. पण तो आजच्या लेखाचा “विषय” नाही. साबण साबण खेळणारे लोक सुद्धा या जगात आहेत. अशा “साबू”दाण्यांना कोपरा-ढोपरा पासून नमस्कार ............ “साबू” हा शब्द आणि साबणाला “साबू” म्हणणारे लोकच आवडत नाहीत मला मुळात ...........आणि हो .......मला न आवडणाऱ्या लोकांमध्ये आंघोळीला जास्त वेळ लावणारे लोक सुद्धा आहेत. मुळात त्यांना वेळ लागण्यासारखे आंघोळीमध्ये काय असते {विशेषत: पुरुषांना !!!!!!} हे मला अजूनही कळलेले नाहीये आणि कळून तसा फायदाही काही नाही म्हणा ........म्हणजे एखादी कार धुवावी तसे किती किती कोनातून धुवू शकत असतील हे लोक आपले अंग? बर आणि विविध क्रीम लावावी तसे “चला आता हा लिरील साबण झाला आता डव लावूया ....डवचा डाव टाकून झाला आता निम साबण लावूया .......निम झाला आता उटणे लावूया” असे तर होत नाही ना? ..उटण्यावरून आठवण झाली की उटणेच साबणापेक्षा श्रेष्ठ. त्वचेची हानी होत नाही. त्वचेवरील तेल खरवडून काढले जात नाही. आणि उटण्याने आंघोळ केल्यावर दिवसभर आपला आपल्याला सुद्धा एक मस्त सुगंध जाणवत रहातो. मित्रांनो केवळ वासावरून आपला आवडता साबण कोणता हे ठरवू नका. त्यामध्ये Fatty पदार्थ असतो म्हणजे थोडक्यात चरबी किंवा वसा ...... तर साबणात या चरबीचे प्रमाण ६०-६५ टक्क्यांच्या वर असायला हवे. ते ७० टक्के असेल तर उत्तम. नाहीतर आपल्या त्वचेच्या आतले शरीराला आवश्यक असलेले तेल सुद्धा शोषून घेतो आणि त्वचा शुष्क-कोरडी होते. यासाठी साबण घेताना TFM [ Total Fatty Matter] हे ६५ टक्क्यांच्या वर असेल तो साबण घ्या. कुठलाही भारी साबण घेतलात तरी तो हेमा, जया, सुषमाने अंगाला घासलेला नसेल. त्यामुळे ते महत्वाचे नाहीये. .......असो. तर साबणाला साबू म्हणणारे आणि आंघोळीला वेळ लावणारे लोक मला आवडत नसले तरी पण घाबरू नका. मी घेतो आवडून सगळ्या प्रकारचे लोक माझ्या स्वभावानुसार ..........पूर्वी माश्याच्या आकाराचे साबण येत असत आणि त्याला दोरी लावलेली असे. हे साबण बेसिन वर टांगले जात असत.......... मग .............. येणारे जाणारे सर्व जण .........”शि”व शिव शिव ........... हल्ली लिक्विड सोपच्या बाटल्यांनी मात्र चांगली सोय केलेय बाबा ...........असो. विषयाला उगाचच अ”शी” कलाटणी मिळतेय साबणामुळे ........
काही सज्जन “आंघोळ” या नावालाच भितात ...........एरवी उत्तमपणे काम करणारे हे कामसू आंघोळीचे नाव काढले रे काढले की घोळ घालायला सुरवात करतातच .......कामात सारख्या चुका व्हायला लागतात मग यांच्या .....आजच्या दिवस आंघोळ नाही केली तर नाही का चालणार इथ पासून सुरु झालेली गाडी शेवटी बहुतांशी “ जाऊ दे ...आज आंघोळीची गोळीच घेऊन टाकतो” असे म्हणत बिना स्नानाचा दिवस काढण्याच्या निश्चयावर येऊन थांबते. पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू या गोळीबाराला कारण ठरू शकतात. रविवार हा वार मुळात आंघोळ करण्यासाठी नसतोच असे काही लोकांचे पक्के मत आहे. { आणि रविवार हा वार आपल्या नवऱ्याला पक्के सोलून काढायचा सुद्धा वार आहे असेही काहींचे किंवा खरे सांगायचे तर काहीजणींचे ठाम मत आहे. } तर काही जणांकडे आंघोळीला सुट्टी टाकणे [ सिक होणे किंवा सिक लिव्ह यांचा आणि आंघोळ न करणे यांचा जवळचा संबंध आहे बरे] सोडाच या दिवशी घराची साफसफाईच इतकी येऊन पडते की बस रे बस ............. मग काय? आंघोळ करावीच लागते ना?
काही लोक तर घामाने इतकी आंघोळ करतात की दर तासा तासाने त्यांना स्पंजिंग करतात की काय असे वाटावे एखाद्याला. { खरे तर स्पंजने त्यांचा घाम पार रगडून पुसून पिळून काढून उघडे बसवावे असे वाटते कधी कधी } हे ओले ओले लोक इतके ओले असूनही कधीही आंघोळ करून आलेत असे वाटत नाही. काहींच्या घामाचा वास एखाद्याला बस अथवा रेल्वेतून उतरायला भाग पाडू शकतो. यांच्या घरी मोलकरीण टिकणे किती अवघड असू शकते याची कल्पना येते बाबा. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे नेमक्या या लोकांना अंगचटीला येण्याची इतकी वाईट सवय असते की हा घाणेरडा वास मनातल्या मनात दाबून ठेवून आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य किंवा गेला बाजार स्मित तरी ठेऊन वावरून वावरून आपल्याला घामाच्या धारा लागायची वेळ येते पण त्यांना अरे बाबा दूर सरक असे म्हणणे कठीण होऊन बसावे.
२००९ च्या डिसेंबर मध्ये आमच्या कडे एक जपानी मुलगी चार दिवस रहायला आली होती. जपानच्या एका संस्थेच्या कार्यक्रमा अंतर्गत ती भारतात आली होती आणि आमची गायत्री Japanese शिकत असल्याने आम्ही तिची आमच्या घरी उतरण्याची व्यवस्था केली. चार दिवस, पुणे अलिबाग दर्शन तिला करवले. ३१ डिसेंबरला त्यांचा सगळा ग्रुप मुंबईला गेला आणि नंतर तिथून जपानला. तर तेव्हा ही मंडळी आमच्या घरी रहायला येण्याआधी आयोजकांनी आम्हाला सांगितले की जपानला रात्री आंघोळ करतात. त्यामुळे आम्हाला तिच्या आंघोळीची व्यवस्था चार दिवस रात्री करून द्यावी लागली होती. अर्थात तेव्हा आम्ही वारज्याला आमच्या Flat वर रहायला होतो आणि तिथे सुद्धा Gas गिझर होता त्यामुळे गरम पाण्याचा तसा प्रश्न आला नाही. पण त्यानुसार जेवण, झोपणे आणि इतर गोष्टी आखायला लागल्या. आपण आंघोळ करून मग देवपूजा आणि इतर कामाला लागतो तर तेही कामालाच लागतात पण झोपेच्या ...........
मला गार पाण्याने आंघोळ करायला अजिबात आवडत नाही. मला आंघोळीला एकदम कढत कढत आणि २-३ बादल्या पाणी लागते. वज्रेश्वरी वगैरे सारखे एखादे गरम पाण्याचे कुंड-बिंड आमच्या धायरीत सापडले तर मी जाम खुश होईन. मग कितीही कुंद हवा असली तरी या कुंडावर मी स्नान करून म्हणजे ४ डुबक्या मारून येईनच ...........पण हे असले तरी मला जे लोक वर्षानुवर्षे कोणताही ऋतू असो बाहेरच झोपतात, बाहेरच गार पाण्याने आंघोळ करतात त्यांचे नवल वाटते आणि वाईट सुद्धा. पुण्यात सध्या इतकी थंडी आहे की पाण्यात हात घातले तर हात गोठायची भीती वाटते. चूळ भरणे अशक्य होते. स्वेटर आणि गरम पांघरुणे सुद्धा गार पडतात. घरात सगळी दारे खिडक्या बंद करून २-२ रग घेऊन, स्वेटर, कानटोप्या, मफलर, हातमोजे, पायमोजे असा जामानिमा करून झोपणारे आणि तरीही “अरे........ कुठून गार वारा येतोय आत कळत नाही. किती थंडी वाजतेय नाही?!!!!” असे करवाद्णारे आपण आणि हे उघड्यावर? अशा स्थितीत हे लोक कसे काय बाहेर झोपू शकत असतील? प्रभूने त्यांना किमान तेवढा तरी निवारा द्यावा ही त्याच्याकडे कळकळीची प्रार्थना ...........
पुरुषांना न्हाण वगैरे वगैरे येण्याचे काही वय नसते. पण “न्हानपण” म्हणजे लहानपण जाण्याचे वय मात्र असते. मग हळूहळू मुले सुद्धा झाकून-लाजून आंघोळ करायला लागतात. आणि जीवन पुन्हा पुढे सुरु होते ..............
इति स्नानपुराणं ........... प्रवचन संपले आहे ........... उद्या आंघोळीचे लक्षात ठेवा आणि मस्त शांत झोपा आता मित्रांनो ........ शुभ रात्री ...........
!! इति लेखनसीमा !!
आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास शुचीर्भुते ........
गंगासागर इमारतीच्या बाजूला, यमुना नगर,
हमामखान्याजवळ, धोबी घाट......... वगैरे ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा