बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

त्या पारंब्यांनाच विचार,
आकाशात जन्म घेऊन मातीत का बरं शिरायचं,
पिंपळापोटी जन्म घेऊन त्यालाच कसं सावरायचं,
आपली प्रीतीही तशीच,
जुनी तरीही ताजी,
कणखर तशीच निर्मळ,
आणि लवलवती तशीच चिवट,
अगदी त्या पारंबीसारखीच...
तुही त्या पारंबीसारखीच........
ज्याच्या सोबत आयुष्य घालवलं, त्याच्याकडे वर मान करून पाह्यलंच नाहीस कधी.
माझ्या सावलीत आयुष्य घालवून तू मात्र रुसलेली...
इतरांना सावली देतो म्हणून....
अग वेडे, इतरांची सावली काढून घेतली असती तर,
तुझं आयुष्य नसतं का वैराण झालं !!!!!
पूस ते डोळे, आणि पहा वर नीट, 
मलाही पाहुदे तो झुकलेला मुखचंद्र,
उन्नत झालेला,
फक्त एकदाच.......
(रत्नकांत)

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

आई..................!!!


आई..................!!!

लिहिले ब-याच जनांनी
लिहितील बरेच काही
शब्द साच्यात बंद होई
महती तुझि ग आई..............



केले तु हट्ट पूर्ण
असता मि बाळ तान्हा
पाजुनी मोठे केले
तुझा तु अमृत पान्हा...............




आई तुझ्या प्रितीचे
जगात ह्या मोल नाही
तव अंगाई गिताने
मज शांत झोप येई....................



आई म्हणु मि कोणा
न साद कूणी देई
हंबरुणी वासराचा
कोरडा हा कंठ होई.....................


आई म्हणु तुला ग
शकुला हा तुझा पुकारी
जरी स्वामि तिन्ही जगाचा
तव विना मि भिकारी  ..................


मोहन कु-हाडे .........................

मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१२

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको



मराठी गाण्यांमध्ये भावगीताला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे आणि त्यातूनही जर ते सुधीर फडके यांनी गायलेले असेल तर मग विचारायलाच नको. असेच एक भावगीत. ज्याचे शब्द वा. रा. कांत यांचे असून याला यशवंत देव यांचे संगीत लाभलेले आहे. आणि हे गीत म्हणजे 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको' ज्याला हे गाणे माहित नसेल असा व्यक्ती विरळच. आणि आज याचं गाण्याची चाल मी उचलली आहे माझ्या ओळींसाठी. यामागे मूळ गाण्याचा किंवा त्यामागे असणाऱ्या मोठ्या लोकांचा उपमर्द करणे हा कोणताही हेतू नाही. फक्त एक तात्पुरता विरंगुळा म्हणून मी हे इथे टाकतो आहे.

आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||

ऐकताना समोरचे होते जे कुजबुजणे
पाहतांना मला मात्र नको होते हे जिणे
चांगल्या कारेक्रमाला गालबोट लाऊ नको ||

रोखुनी पलकात पाणी, बोल सारे ऐकले
अन् तुझ्या हट्टापुढे गं हात माझे टेकले
या घडीला वाहवेची दाद तू मागू नको ||

काय बोलू म्हणने माझे आज तरी पटेल का?
आवाजाची आज तुझ्या, लाज तुला वाटेल का?
नितनवी गाणी म्हणत, तू अशी जागू नको ||

आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको
चांगल्या गाण्याची अशी वाट तू लावू नको
आज राणी पूर्वीची ती गाणी तू गाऊ नको ||

मिलिंद जोशी, नाशिक

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

आजचा निबंध... महागाई

आजचा निबंध... महागाई ( वा... काय विषय आहे... मस्त... लै भारी... )

आज महागाई या विषयावर मला लिहायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. सध्या सगळ्यांच्या तोंडी हा एकच शब्द असतो. खरे तर महागाई म्हणजे काय हे सांगण्याची काही गरज नाहीये. पण निबंध म्हटला की त्या शब्दाचा अर्थ हा सांगावाच लागतो. तसा अलिखित नियमच आहे. 
महागाई म्हणजे जी सगळ्यात मोठ्ठी, महत्वाची, सगळ्यात शक्तिशाली गाय असते ती. म्हणूनच तिला महागाई असे म्हणतात. खोटे वाटते तुम्हाला? उदा. देवांचे देव म्हणजे महादेव, पैसा, संपत्ती, लक्ष्मी यांची देवता महलक्ष्मि, सगळ्यात वरचा मंत्री म्हणजे महामंत्री तसेच सगळ्यात शक्तिशाली गाई म्हणजे महागाई. कळलं?????? ( टीव्हीवरील टुकार सिरीयल ‘पुढंच पाऊल’ मध्ये आक्कासाहेब सुद्धा नेहमी असेच म्हणत असतात. कोणालाही... बहुतेक त्यांना फक्त हा शब्द उच्चारला तरच एपिसोडचे पैसे मिळतील असे त्या सिरीयलच्या निर्मात्याने बजावून सांगितले असावे... असो मला काय करायचे... )
मला महागाई खूप आवडते. आपल्या सरकारला सुद्धा महागाई खूप आवडते. याला दोन कारणे आहेत 
१. आपला बहुसंख्य हिंदू धर्मियांचा देश आहे आणि हिंदूंना गाय माता वाटते. 
२. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याला अनेक कारणाने गाय ही महत्वाची असते. 
आणि ही तर महागाई... मग नको का आवडायला? जसे महादेव, महलक्ष्मि अगदी महामंत्री सुद्धा सामान्य जनतेसाठी अदृश्य रुपात असतात तशीच महागाई सुद्धा अशीच अदृश्य रुपात असते पण वेळोवेळी आपले अस्तित्व लोकांना दाखवीत असते. महागाईला चार पाय असतात. सरकारी नोकरी, आय टी कंपनीतील नोकरी, कार्पोरेट नोकरी ( व्यवस्थापन क्षेत्रातील ) आणि राजकारण असे ते चार पाय होत. या चार पायांच्या जोरावर ती खंबीरपणे उभी असते. तिच्या तोंडाला सरकारी बाबू असे नांव आहे. ते नेहमी काहीतरी खात असते आणि एरवी रवंथ करीत स्वस्थ बसलेले असते. तिच्या डोळ्यांना CBI असे संबोधले जाते. ते नेहमी तेच पाहतात जे तिचा मालक ( सरकार ) त्यांना पाहायला सांगतात. तिला दोन शिंगे सुद्धा असतात. सबसिडी कपात आणि भाववाढ. ही शिंगे महागाईची महत्वाची अस्त्रे आहेत. तिला दोन कान सुद्धा असतात. काही जण उगीचच त्यातील एकाला विरोधी पक्ष आणि दुसऱ्याला मिडिया असे म्हणतात. तिला एक भले मोठे पोट आहे. त्याला काहीजण अर्थव्यवस्था असे म्हणतात. सरकार नेहमी याची काळजी घेते. असे म्हणतात की या पोटात ३३ कोटी राजनेत्यांचा वास असतो. ( वास म्हणजे राहणे... उगाच गैरअर्थ काढू नका ) तिला एक शेपटी असते. ज्याला जनता असे म्हटले जाते. थोडक्यात काय तर ३३ कोटी राजनेत्यांनी लटकवलेली ती... जनता... त्यामुळे या जनतेच्या वाट्याला अर्थव्यवस्थेतून न पचलेला भाग... ( कोणी कोणी त्याला शेण असे म्हणतात ) तेवढा येतो. जशी सामान्य गाय दुध देते तशी ही महागाई आपल्याला नवीन नवीन योजना देते. उदा. FDI, खुली आणि निर्बंधित अर्थव्यवस्था, निर्यातीवर प्रतिबंध इत्यादी इत्यादी. अशी ही महागाई मला खूप खूप आवडते... त्यासाठी तर मी तिची आरती सुद्धा लिहिली आहे. मला वाटते जी सगळ्यांनी रोज किमान दिवसातून ३ वेळेस तरी म्हटली पाहिजे...

जय जय महागाई बोला जय जय महागाई 
तुमच्या दर्शनाने २ घाबरते बाई, बोला जय जय महागाई ||

तुमच्या कृपेने होती प्रजाजन हो त्रस्त देवी प्रजाजन हो त्रस्त
येणाऱ्या पगारावर 2 ठेवू कशी भिस्त, बोला जय जय महागाई ||

तुम्ही कृपा ही केली झाली मला पीडा देवी झाली मला पीडा
१० रुपये खर्चूनही 2 आज मिळत नाही विडा, बोला जय जय महागाई ||

तुमच्या येण्याने देवी सुखावती राजकारणी देवी सुखावती राजकारणी
इथूनच भ्रष्टाचाराची 2 होते पायाभरणी, बोला जय जय महागाई ||

तुमचा वापर देवी राजकारणी करिती देवी राजकारणी करती 
मिलिंद प्रेरित झाला 2 केली आरती तुम्हावरती, बोला जय जय महागाई ||

मिलिंद जोशी, नाशिक...

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१२

स्वर्गसुखाचा अर्णव त्यागुनी तुझियासाठी आलो,


तुझ्या प्रीतीचा गंधित शेला चांदण्यात मी ल्यालो .

सोडूनी सिंहासने जरी मी पायउतार झालो,

स्वेच्छेने तव हृदयमंदिरी फकीर होऊनी जगलो.


रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

तुला चांदण्यात गाताना पाहून माझ्या नजरेला पडली भूल,

नुझे नेत्र मिटलेले, अन हात सतारीच्या तारांवर नाचण्यात मश्गुल.....


आकाशी धुंद चांदण्याची बरसात, अवनीवर सूर बोलती सात,


निसर्गावर पसरली शब्द-सुरांची सुगंधी बिसात......