दीन .....
हल्ली मी उमलणं सोडलंय.
आधी उमलून तुझा पाठलाग करणे,
तू गेल्या दिशेने मान वळवून,
तृषार्त नजरेने पाठलाग करणे जमत नाही मला.
पण तुझी ती सवय जायची नाही कधी.
तेंव्हाच बजावलं होतं ना, खिडकीत रोज येवू नकोस म्हणून!!
तुझ्या सावलीने बरसत राहणारा गंध,
दुरून अनुभवण्याची माझी जिद्द तुला भावला नसती.
तू केलेल्या पारिजाताच्या फुलांचा, लांबचलांब गजरा,
एक टोक तुझ्या हाती आणि दुसरं माझ्या नाकापर्यंत,
मी फक्त हुंगायच.
मला हात लावायला बंदी, जशी तू नजरकैद आणि मी स्वच्छंदी...
तो शेवटचा क्षण, तुझं असह्य रुदन, आणि मजवरचा आघात;
मी अजुनही तळमळतोय तुझ्या एका कटाक्षाला,
पण आता माझा आवाज कुणाला ऐकू येत नाही.
निपचित पडलेल्या कलेवराला आवाज नसतो.
मी तुला कधीच दिसणार नाही,
आयुष्यभर वाहतोय हा फसवणुकीचा आळ.
फक्त एकंच इच्छा,
तू माझी आयुशाभर वाट पहावीस, वाटल्यास विश्वासघातकी म्हणावेस.
पण, माझं हे पराधीन जगणं तुला कळू नये,
त्यापेक्षा तुला लाभणारे अज्ञानातले सुख आणि गैरसमजातून तू मला दिलेली दुषणे,
मी माझ्यासोबत परलोकी नेईन......
.........(रत्नकांत)