मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

भांडवली मळा


मकर संक्रांत

सुप्रभात मित्रांनो ............ मकर संक्रांती निमित्ताने आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा ............संक्रांतीची एक छोटीशी पण उत्तम माहितीपूर्ण पोस्टची भेट ...........
इंग्रजीत लोक एक विष कमी म्हणून अनेक "Wishes" देतात ...........मी तुम्हा सर्वांसाठी "अमृत" चिंतितो ............
तिळगुळातला गुळ फक्त गोड नसतो तर त्यात लोह, खनिजे, २१ प्रकारचे क्षार, उर्जा भरपूर असते ........ती तुमच्या कार्यात दिसू दे .........हे क्षार तुमच्या शरीरातील जी वीज असते ना की ज्या विजेमुळे तुम्हाला सगळ्या संवेदना होतात तर त्या विजेच्या वहनासाठी आवश्यक असतात.मित्रांनो आपले हृदय सुद्धा याच विजेवर चालते. याचे वहन बिघडले तर मग “पेसमेकर” बसवावा लागतो. आपल्या शरीरात उणे [मायनस] ५० ते ७० Nano व्होल्टस इतके विजेचे वहन होत असते. आणि हाच आपल्या शरीरातील “वायू” किंवा वात होय असे तुम्ही म्हणून शकता. याचे काम बिघडले की ८० प्रकारचे वातरोग होतात. अर्दितवात- तोंड वाकडे होणे, मन्यास्तंभ- मान आखडणे, Palaralysis- लकवा मारणे, संधिवात, आमवात वगैरे वाताचे विविध प्रकार आहेत. पूर्वी कोकणात उन्हाच्या वेळी दुपारी कोणी घरी आले तर त्याला प्रथम त्याच्या हातावर गुळ दिला जात असे आणि नंतर पाणी ............ म्हणजे जेणे करून उन्हातून आल्या आल्या पाणी प्यायले जायला नको आणि उन्हातून घामावाटे बाहेर गेलेले क्षार भरून निघावेत ....जसे कंदिलाच्या गरम काचेवर पाणी उडाले तर ती तडकते तसेच आपल्या शरीराचे होते. उन्हातून आल्यावर एकदम थंड पाणी पिणे योग्य नाही. शरीरातील व्यवस्था बिघडते मग .....अर्थात वातरोगांचे गुळ हे औषध नव्हे किंवा क्षार कमी पडणे हेच एकमेव कारण सुद्धा नव्हे बरं का दाजी .......... शाकाहारी लोकांना लोह कमी मिळते ते गुळाच्या योग्य सेवनातून भरून काढले जाऊ शकते. गुळ पाणी प्यायल्याने फुफुस विकार सुद्धा दूर राहतात असेही आढळून आलेले आहे. आपले वडारी समाज बांधव सकाळी भर उन्हात कामाला सुरवात करण्यापूर्वी एक पेलाभर गुळाचे पाणी पिऊन सुरवात करत असत. सध्याचे मला माहित नाही. यामुळे दिवसभर शरीराला प्रचंड मेहनत करण्याची शक्ती तर मिळतेच पण उन्हाचा त्रास सुद्धा कमी जाणवतो. मित्रांनो तुम्ही कधी लिंबाचे वगैरे सरबत घेतलेत तर ते शक्यतो गुळ घालून बनवून घ्या. म्हणजे अनायासे तुम्हाला २१ प्रकारचे क्षार, उर्जा, लोह हे सगळे मिळेल.
तीळ पुढारयांसारखे नुसते पांढरे कपडे घालून आलेले नसतात तर त्यांच्या अंतरात एक स्नेह असतो ..........कॅलशियम असते .......प्रथिने असतात .........पोटातील अल्सर तीळ तेल पोटात घेतल्याने बरा होतो. वजन कमी होते. शौचास साफ होते. म्हातारपण लवकर येत नाही. तिळाच्या तेलाच्या मालिशने त्वचा उजळते. अंगात शक्ती वाढते. श्रम सहन करण्याची शक्ती येते. लघवीला जास्त वेळेला होत असल्यास सकाळ संध्याकाळ ५-५ ग्राम ओवा आणि तीळ मिसळून चावून खाल्ले तर लघवीचा त्रास कमी होतो. तिळाचे तेल डोक्याला लावल्याने केस काळे राहतात. फक्त तिळाचे तेल डोळ्यांना मात्र नुकसानदायक आहे. त्यामुळे डोळ्यांना लागू देऊ नये. २० ग्राम तीळ गरम पाण्यात वाटून त्यात २० ग्राम ताजे लोणी घालून खाल्ले तर रक्ती मुळव्याध बरी होते.
साजूक तूप --------- पूर्वी दुध, तूप, लोणो, दही, ताक हे सर्व म्हंटले की ते गाईच्या दुधापासून बनवलेले असे आयुर्वेदात किंवा एकूणच भारतात अपेक्षित होते. आता आपल्याकडचे “गौळी” {गवळी हा शब्द गौ म्हणजे गाय पाळणारे या वरूनच आलेला आहे.] म्हशी पाळतात आणि आपण सारेजण म्हशीचे दुध पितो या अर्थाने “अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी” असे म्हणायला हरकत नाही. व्यायाम करणाऱ्या लोकांना हे म्हशीचे दुध ठीक पण गायीचे दुध पचायला हलके असते. जवळपास सर्वांना हे दुध मानवते. बकरीचे दुध अगदी जराजर्जर लोकांना उत्तम पण त्याचे परिणाम दीर्घकालीन टिकणारे नव्हेत. म्हणून गायीचे दुध उत्तम. विदेशी लोक आपल्या सारखे आता गायीचे दुध पितात आणि आपण मात्र म्हशीचे .......... विदेशात म्हशीचे दुध अभावानेच मिळते. तिकडे सोयाबीनचे, बदामाचे, शेंगदाण्याचे, नारळाचे असे विविध प्रकारचे आणि फ्लेवर्ड दुध मिळते. तर हे जे तूप आहे ना ते शरीराला एक सुंदर आकार देते. त्वचा नितळ बनवते. उर्जा देते. संकटकाळासाठी लागणारी उर्जा शरीरात साठवते. शरीरामध्ये लुब्रीकेशनचे काम करते. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना त्यातील चरबीतून उत्तम Fats मिळतात पण त्याला या तुपाची सर येऊ शकत नाही.
यात चवीला आणि खुसखुशीतपणा आणायला थोडे खोबरे घातले जाते. खोबरे अत्यंत पौष्टिक आहे. ज्या व्यक्तींना अन्न पचत नाही त्यांच्यासाठी दिवसभर थोडे थोडे शहाळ्याचे पाणी घेणे, नारळाचे दुध घेणे हे अतिशय उपयुक्त असते. काही निसर्गोपचार केंद्रांवर अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या रुग्णांना गुदमार्गावाटे म्हणजे संडासच्या जागेतून एनिमाद्वारे फळांचे रस, नारळाचे पाणी, नारळाचे दुध, शिवांबू [स्वमुत्र] दिले जाऊन त्यांना पुन्हा जीवन दिले गेलेले आहे. तुम्हाला आश्चर्य आणि वाचायला अत्यंत विचित्र वाटेल पण निसर्गाचे हा उलटफेर आहे की मोठ्या आतड्यातील ज्याला आपण मल म्हणतो तिथेच आपण खाल्लेल्या अन्नद्रव्याचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यामुळेच आपण सारखी पोट साफ करणारी द्रव्ये घेतली किंवा जास्त जुलाब झाले तर इथला मल निघून जाऊन फार अशक्तपणा येतो. अर्थात या वेळेस पाणी आणि क्षार सुद्धा जास्त प्रमाणात कमी झाल्याने हा अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे जर या निसर्गोपचार केंद्रांवर गुद मार्गावाटे पोषण दिले जाऊन रुग्णांचे प्राण वाचवले गेले. कारण अशा रुग्णांच्या जठर आणि लहान आतडे वगैरे भागांची मोठ्या प्रमाणात क्षती म्हणजे हानी झालेली होती. तर सांगायचे आरण नारळ पाण्यात फक्त “सी” विटामिन नसते. इतर सर्व घटक असतात. त्यामुळे त्यात लिंबू पिळून नारळ पाणी घेतले तर हा एक पूर्ण आहार होऊ शकतो. नारळाच्या झाडाला म्हणजे माडाला कल्पवृक्ष म्हंटले गेलेले आहे. त्याच्या प्रत्येक अंगाचा माणसाला अत्यंत मोठ्या प्रमाणात उपयोग होत आलेला आहे.
यामध्ये चवीला किंचित वेलदोडा किंवा वेलची सुद्धा काहीजण घालतात. पण काहीच जण. वेलचीचा पोट साफ होणे, कफ कमी करणे वगैरे अनेक विकारांवर उपयोग होतो. त्यावर मी वेगळ्या पोस्ट मध्ये सांगेन.
तर बघा हिंदू धर्माने किती विचार करून धर्मातील या चालीरीती, खानपान, व्यवहार, आहार-विहार हे योजलेले आहे. आत्ता थंडी असते आणि शरीरात उष्णता निर्माण व्हावी आणि ती धरून ठेवली जावी म्हणून उष्णता आकर्षित करून घेणारे आणि आणि ती धरून सुद्धा ठेवणारे काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीला भगिनी परिधान करतात. जेव्हढा काळोख जास्त .....चांदण्या दिसण्याचे प्रमाण तितके जास्त ....... म्हणून वर चांदण्या रेखलेली साडी दिसते किती सुंदर नाही? काळोखातच तर उजेड किंवा प्रकाशाची छोटीशी तिरीप सुद्धा किती उठून दिसते नाही का? एरवी मात्र हिंदू धर्माने हा काळा रंग त्याज्य मानलेला आहे. निषिद्ध ठरवलेला आहे.
आता सूर्य दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जायला लागेल. आपल्या पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या सन्मुख येईल म्हणजे समोर येईल. आणि उन्हं वाढायला लागतील. थंडी कमी होईल. शेकोट्या कमी होतील आणि सरबताच्या गाडीवर, थंडगार लस्सीच्या दुकानात, कलिंगडाच्या ढिगाकडे गर्दी वाढायला लागेल. गॉगल विकणाऱ्या, टोप्या घालणाऱ्या लोकांचे पोट भरायला लागेल. पण मनातली प्रेम, स्नेह, मित्रता, आपुलकी, जिव्हाळा यांची शेकोटी कधीच विझू देऊ नका मित्रांनो .........
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देऊन आजच्या पुरेसा थांबतो .......तिळगुळ घ्या गोड गोड बोला .............
नेहमीच गोड बोलणारा आणि गोड वागणारा सदैव आपला मित्र,

Dr. हेमंत उर्फ कलादास ............

स्नानपुराणं

घोळ आणि आंघोळ यांचा काही संबंध आहे का? आं"घोळ" झाल्या नंतर "घोळ"दार पायजमा वगैरे वगैरे कपडे असतातच ........ “घंगाळ” शब्दाचा या घोळाशी संबंध आहेच. आंघोळ न करता वंगाळ राहणारे असणारच ना?
काही माणसे कधी कपडे बाहेर { म्हणजे बाथरुमच्या} विसरतात आणि “हर गंगे भागीरथी” करत करत आणि देव जाणे ( खरंच तोच जाणो रे बाबा) कोणकोणत्या देवांची स्तोत्रे म्हणत म्हणत { हे यांची आंघोळ चालू आहे हे लोकांना का ओरडून सांगतात नकळे} जोरदार बाद्ल्याच्या बादल्या अंगावर ओतून घेउन आंघोळ करतात आणि कपड्यांचा घोळ बाहेरच विसरलेले असतात .............काही जण साबण संपलाय हे उशिरा लक्षात आल्यावर फार म्हणजे फार अस्वस्थ होतात. बाथरूम मध्ये एखादा साबणाचा [ लिक्विड सोप प्रमाणे] सुद्धा नळ वगैरे असावा असे या लोकांना अशा वेळेस वाटत असावे बहुतेक. [ मला लहानपणी { कंसात कंस- म्हणजे माझ्या लहानपणी बरं का दाजी } असे रस्तोरस्ती चहाचे, कॉफीचे, विविध सरबतांचे नळ असावेत असे फार्र्र्र म्हणजे फार्रर्र वाटत असे. आणि त्याला १-१ मैलावर कॉक असावेत. झाली इच्छा की पी चहा किंवा कॉफी किंवा सरबत ........ पण मी “नल राजा” न होता “हेमंत” झाल्याने ते वास्तवात आले नाही. ] आणि अंगावर चार तांबे पाणी ओतून घेऊन झाल्यावर साबणाची आठवण झाल्याने यांची चिडचिड होते. अस्वस्थ होतात हे लोक. ( आणि हातातली कामे सोडून यांना साबण देत बसावे लागल्याने बाहेरचे अस्वस्थ) मग ते हात { फक्त} बाहेर काढून साबण हळूच आत घेणे वगैरे वगैरे ........या साबण आत घेण्यातले आणि अर्थातच देण्यातले जे विविध प्रकार होतात [म्हणजे ते कोण देतय आणि कोण घेतय यावरून] त्यावर एक वेगळा लेख होऊ शकेल. पण तो आजच्या लेखाचा “विषय” नाही. साबण साबण खेळणारे लोक सुद्धा या जगात आहेत. अशा “साबू”दाण्यांना कोपरा-ढोपरा पासून नमस्कार ............ “साबू” हा शब्द आणि साबणाला “साबू” म्हणणारे लोकच आवडत नाहीत मला मुळात ...........आणि हो .......मला न आवडणाऱ्या लोकांमध्ये आंघोळीला जास्त वेळ लावणारे लोक सुद्धा आहेत. मुळात त्यांना वेळ लागण्यासारखे आंघोळीमध्ये काय असते {विशेषत: पुरुषांना !!!!!!} हे मला अजूनही कळलेले नाहीये आणि कळून तसा फायदाही काही नाही म्हणा ........म्हणजे एखादी कार धुवावी तसे किती किती कोनातून धुवू शकत असतील हे लोक आपले अंग? बर आणि विविध क्रीम लावावी तसे “चला आता हा लिरील साबण झाला आता डव लावूया ....डवचा डाव टाकून झाला आता निम साबण लावूया .......निम झाला आता उटणे लावूया” असे तर होत नाही ना? ..उटण्यावरून आठवण झाली की उटणेच साबणापेक्षा श्रेष्ठ. त्वचेची हानी होत नाही. त्वचेवरील तेल खरवडून काढले जात नाही. आणि उटण्याने आंघोळ केल्यावर दिवसभर आपला आपल्याला सुद्धा एक मस्त सुगंध जाणवत रहातो. मित्रांनो केवळ वासावरून आपला आवडता साबण कोणता हे ठरवू नका. त्यामध्ये Fatty पदार्थ असतो म्हणजे थोडक्यात चरबी किंवा वसा ...... तर साबणात या चरबीचे प्रमाण ६०-६५ टक्क्यांच्या वर असायला हवे. ते ७० टक्के असेल तर उत्तम. नाहीतर आपल्या त्वचेच्या आतले शरीराला आवश्यक असलेले तेल सुद्धा शोषून घेतो आणि त्वचा शुष्क-कोरडी होते. यासाठी साबण घेताना TFM [ Total Fatty Matter] हे ६५ टक्क्यांच्या वर असेल तो साबण घ्या. कुठलाही भारी साबण घेतलात तरी तो हेमा, जया, सुषमाने अंगाला घासलेला नसेल. त्यामुळे ते महत्वाचे नाहीये. .......असो. तर साबणाला साबू म्हणणारे आणि आंघोळीला वेळ लावणारे लोक मला आवडत नसले तरी पण घाबरू नका. मी घेतो आवडून सगळ्या प्रकारचे लोक माझ्या स्वभावानुसार ..........पूर्वी माश्याच्या आकाराचे साबण येत असत आणि त्याला दोरी लावलेली असे. हे साबण बेसिन वर टांगले जात असत.......... मग .............. येणारे जाणारे सर्व जण .........”शि”व शिव शिव ........... हल्ली लिक्विड सोपच्या बाटल्यांनी मात्र चांगली सोय केलेय बाबा ...........असो. विषयाला उगाचच अ”शी” कलाटणी मिळतेय साबणामुळे ........
काही सज्जन “आंघोळ” या नावालाच भितात ...........एरवी उत्तमपणे काम करणारे हे कामसू आंघोळीचे नाव काढले रे काढले की घोळ घालायला सुरवात करतातच .......कामात सारख्या चुका व्हायला लागतात मग यांच्या .....आजच्या दिवस आंघोळ नाही केली तर नाही का चालणार इथ पासून सुरु झालेली गाडी शेवटी बहुतांशी “ जाऊ दे ...आज आंघोळीची गोळीच घेऊन टाकतो” असे म्हणत बिना स्नानाचा दिवस काढण्याच्या निश्चयावर येऊन थांबते. पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू या गोळीबाराला कारण ठरू शकतात. रविवार हा वार मुळात आंघोळ करण्यासाठी नसतोच असे काही लोकांचे पक्के मत आहे. { आणि रविवार हा वार आपल्या नवऱ्याला पक्के सोलून काढायचा सुद्धा वार आहे असेही काहींचे किंवा खरे सांगायचे तर काहीजणींचे ठाम मत आहे. } तर काही जणांकडे आंघोळीला सुट्टी टाकणे [ सिक होणे किंवा सिक लिव्ह यांचा आणि आंघोळ न करणे यांचा जवळचा संबंध आहे बरे] सोडाच या दिवशी घराची साफसफाईच इतकी येऊन पडते की बस रे बस ............. मग काय? आंघोळ करावीच लागते ना?
काही लोक तर घामाने इतकी आंघोळ करतात की दर तासा तासाने त्यांना स्पंजिंग करतात की काय असे वाटावे एखाद्याला. { खरे तर स्पंजने त्यांचा घाम पार रगडून पुसून पिळून काढून उघडे बसवावे असे वाटते कधी कधी } हे ओले ओले लोक इतके ओले असूनही कधीही आंघोळ करून आलेत असे वाटत नाही. काहींच्या घामाचा वास एखाद्याला बस अथवा रेल्वेतून उतरायला भाग पाडू शकतो. यांच्या घरी मोलकरीण टिकणे किती अवघड असू शकते याची कल्पना येते बाबा. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे नेमक्या या लोकांना अंगचटीला येण्याची इतकी वाईट सवय असते की हा घाणेरडा वास मनातल्या मनात दाबून ठेवून आणि चेहऱ्यावर प्रसन्न हास्य किंवा गेला बाजार स्मित तरी ठेऊन वावरून वावरून आपल्याला घामाच्या धारा लागायची वेळ येते पण त्यांना अरे बाबा दूर सरक असे म्हणणे कठीण होऊन बसावे.
२००९ च्या डिसेंबर मध्ये आमच्या कडे एक जपानी मुलगी चार दिवस रहायला आली होती. जपानच्या एका संस्थेच्या कार्यक्रमा अंतर्गत ती भारतात आली होती आणि आमची गायत्री Japanese शिकत असल्याने आम्ही तिची आमच्या घरी उतरण्याची व्यवस्था केली. चार दिवस, पुणे अलिबाग दर्शन तिला करवले. ३१ डिसेंबरला त्यांचा सगळा ग्रुप मुंबईला गेला आणि नंतर तिथून जपानला. तर तेव्हा ही मंडळी आमच्या घरी रहायला येण्याआधी आयोजकांनी आम्हाला सांगितले की जपानला रात्री आंघोळ करतात. त्यामुळे आम्हाला तिच्या आंघोळीची व्यवस्था चार दिवस रात्री करून द्यावी लागली होती. अर्थात तेव्हा आम्ही वारज्याला आमच्या Flat वर रहायला होतो आणि तिथे सुद्धा Gas गिझर होता त्यामुळे गरम पाण्याचा तसा प्रश्न आला नाही. पण त्यानुसार जेवण, झोपणे आणि इतर गोष्टी आखायला लागल्या. आपण आंघोळ करून मग देवपूजा आणि इतर कामाला लागतो तर तेही कामालाच लागतात पण झोपेच्या ...........
मला गार पाण्याने आंघोळ करायला अजिबात आवडत नाही. मला आंघोळीला एकदम कढत कढत आणि २-३ बादल्या पाणी लागते. वज्रेश्वरी वगैरे सारखे एखादे गरम पाण्याचे कुंड-बिंड आमच्या धायरीत सापडले तर मी जाम खुश होईन. मग कितीही कुंद हवा असली तरी या कुंडावर मी स्नान करून म्हणजे ४ डुबक्या मारून येईनच ...........पण हे असले तरी मला जे लोक वर्षानुवर्षे कोणताही ऋतू असो बाहेरच झोपतात, बाहेरच गार पाण्याने आंघोळ करतात त्यांचे नवल वाटते आणि वाईट सुद्धा. पुण्यात सध्या इतकी थंडी आहे की पाण्यात हात घातले तर हात गोठायची भीती वाटते. चूळ भरणे अशक्य होते. स्वेटर आणि गरम पांघरुणे सुद्धा गार पडतात. घरात सगळी दारे खिडक्या बंद करून २-२ रग घेऊन, स्वेटर, कानटोप्या, मफलर, हातमोजे, पायमोजे असा जामानिमा करून झोपणारे आणि तरीही “अरे........ कुठून गार वारा येतोय आत कळत नाही. किती थंडी वाजतेय नाही?!!!!” असे करवाद्णारे आपण आणि हे उघड्यावर? अशा स्थितीत हे लोक कसे काय बाहेर झोपू शकत असतील? प्रभूने त्यांना किमान तेवढा तरी निवारा द्यावा ही त्याच्याकडे कळकळीची प्रार्थना ...........
पुरुषांना न्हाण वगैरे वगैरे येण्याचे काही वय नसते. पण “न्हानपण” म्हणजे लहानपण जाण्याचे वय मात्र असते. मग हळूहळू मुले सुद्धा झाकून-लाजून आंघोळ करायला लागतात. आणि जीवन पुन्हा पुढे सुरु होते ..............
इति स्नानपुराणं ........... प्रवचन संपले आहे ........... उद्या आंघोळीचे लक्षात ठेवा आणि मस्त शांत झोपा आता मित्रांनो ........ शुभ रात्री ...........
!! इति लेखनसीमा !!
आपला मित्र,
Dr. हेमंत उर्फ कलादास शुचीर्भुते ........
गंगासागर इमारतीच्या बाजूला, यमुना नगर,
हमामखान्याजवळ, धोबी घाट......... वगैरे ......

मी भारी ! मी भारी !!



मी भारी ! मी भारी !!
पडलो गर्वाला आहारी ..
मी भारी ! मी भारी !!

सांग तुला जे सांगायचे
मूड तुझा का असला ..
वाह वाह मी देईन तूझं
तव शब्द हवे जे मजला ...

अहम् दाटुनी येतो हा
थोडेेशे कौतुक होता ..
नि:शब्द का मग असतो
मी दुस-यांचा गौरव होता ...

शब्दांचा हा खेळ रे सारा
काल्पनिक ही उंची ..
हावरट हे मन माझे
मग का मागे कौतुक संची ...

प्रतिसाद तुझं हवा हे माहीत
तरी ना राजी होई ..
क्षमता माझी काहीच नसता
साद ना साधा देई ...

वदिले चार मी शब्द मुखातून
समजुन मीच शहाणा ..
निसर्ग हसतो पाहून माझा
डोंगर अहम् बहाना ...

काय खर्च मी "वाह" कराया
गमवून बसतो आज ..
कौतुक करी जो मनापासूनी
असतो तो धनराज ..

पडलो गर्वाला आहारी ..
मी भारी ! मी भारी !!
नतमस्तक मी होउन तुझं पुढ (निसर्गा पुढे)
मनी तुझा आभारी ..

काय मिळविले मिरवुन
येथे मी भारी ! मी भारी ... !!

गर्व मिसळतो मातीत इथल्या
कधी कुणी ना पाही ..

स्मरण तुला राहुदे राजा
अंत हा मातीत होई ...

रहा आभारी या मातीला
चैतन्याचा स्पर्श ..
विनम्रतेने जग तू वेड्या
त्यातच लपला हर्ष ...

तोच एकटा भारी राजा (तो - निसर्ग)
तो भारी ! तो भारी ... !!


- प्रशांत रणसुरे 
( खरंतर नावात "मी" पणाचा अहंकार दडलेला असतो तरी नाव फक्त नाम निर्देशानासाठी टाकलं आहे )

तुझा प्रकाश

आग लागली लागली ...
माझ्या मनात मनात ...
उर भरुन पेटली ..
एक ठिणगी जोरात ...

मला बळ दे बळ दे ..
कष्ट कराया तू आज ...
शरीराला या पिळ दे ..
सर्व काळ दिन-सांज ...

मन निर्मळ होऊ दे ..
सर्व जळुदे जळुदे ...
माझ्या मधला चांगुल ..
मला कळुदे कळुदे ...

स्वप्न धरलं उराशी ..
तेच पाहु दे पाहु दे ...
गवसत नाइ तव ..
नसा नसात वाहू दे ..

आत अंधार साचला ..
जणू दाटला आकाश ...
पडू दे रे मना मधे ..
तुझा प्रकाश प्रकाश ...

- प्रशांत रणसुरे